365 views
रेशनकार्ड काढण्यासाठी घेतले जातात तीन ते पाच हजार
वडगाव मावळ :- शासनाने नागरिकांना रेशन कार्ड मिळविण्यासाठी किंवा त्यातील दुरुस्तीसाठी शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागू नये यासाठी यासाठी शासनाने रेशन कार्ड साथीची सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून दिलेली आहे पण सदर ची प्रक्रिया अवघड व किचकट असल्याने सर्वसामान्य नागरिकांना रेशन कार्ड अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरणे जमत नसल्याने याचा मोठया प्रमाणात गैरफायदा नागरिक सुविधा केंद्र चालक घेत असल्याचे दिसून येत आहे.
रेशन कार्ड काढून देण्यासाठी नागरी सुविधा केंद्र चालक नागरिकांची लूट करत आहेत. नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी तीन ते पाच हजार रुपये घेतले जात आहे तसेच नाव वाढवणे साठी सातशे ते एक हजार रुपये घेतले जात आहे या मुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठया आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. रेशन विभागातून नागरिकांना नागरिक सुविधा केन्द्र मध्ये जाण्यासाठी सांगितले जात आहे. या मुळे नक्की ऑनलाइन रेशन कार्ड सुविधा कोणासाठी चालू करण्यात आली आहे असे प्रश्न नागरिक विचारत आहे . पण या वर कोणाचाही अंकुश असल्याचे दिसत नाही. वस्तुतः नवीन रेशन कार्ड साठी किंवा दुरुस्ती साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्यास कोणत्याही प्रकारची शासनाकडुन आकारण्यात आलेली नाही. तर सर्व प्रक्रिया निःशुल्क केलेली आहे.
जर नागरिकांनी जर स्वतः ऑनलाईन पद्धतीने रेशनकार्ड मिळविण्यासाठी अर्ज केल्यास तालुका पुरवठा विभागातील अधिकारी त्यास लवकर मंजुरी देत नाहीत. मात्र नागरीसुविधा केंद्र चालकांनी केलेल्या अर्जना तत्काळ मंजुरी मिळते पण यात सर्वसामान्य नागरीकांना मात्र आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो आहे.
या संदर्भात नागरिक जेंव्हा तालुका पुरवठा कार्यालयात तक्रारी घेऊन येतात तेंव्हा या कार्यालयातील कर्मचारी नागरीकांना व्यवस्थित माहिती देत नाहीत व नागरिकांशी नीट बोलत देखील नाहीत.
सद्यातर तालुका पुरवठा कार्यालयावर नागरीसुविधा केंद्र चालकांनी ताबा घेतला असून येथील कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीत त्यांचे खुर्चीत बसून कामकाज करताना आढळून येत आहेत.
यामुळे एकंदरीतच शासनाने पुरवठा विभागाच्या ऑनलाईन पद्धतीमुळे सर्व सामान्य नागरीकांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो आहे तर नागरी सुविधा केंद्र चालकाना याचा फायदा होताना
दिसतो आहे.