268 views
पुढील पाच वर्षांत मावळच्या विकासासाठी रक्ताचे पाणी करीन - सुनील शेळके*
*
वडगाव मावळ, 24 ऑक्टोबर - हजारोंच्या संख्येने लोटलेल्या जनसागराच्या साक्षीने, ढोल ताशांच्या दणदणाटात काढलेल्या भव्य मिरवणुकीने मावळचे आमदार सुनील शेळके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस- भाजप- आरपीआय- स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष व मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून आज दुपारी उमेदवारी अर्ज दाखल केला.
वडगाव मावळ येथील तहसीलदार कचेरीत मावळ विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले यांच्याकडे आमदार सुनील शेळके यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विक्रम देशमुख हेही उपस्थित होते. उमेदवारी अर्ज सादर करताना आमदार शेळके यांच्या बरोबर माऊली दाभाडे, गणेश खांडगे, दिपक हुलावळे, बाबुलाल नालबंद उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर झालेल्या जाहीर सभेस राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे, ज्येष्ठ नेते गणेश अप्पा ढोरे, विठ्ठलराव शिंदे, कार्ला येथील एकवीरा देवस्थानचे विश्वस्त दिपक हुलावळे, भाजपा नेते देविदास कडू, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा दिपाली गराडे, लोणावळा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष विलास बडेकर, माजी नगरसेवक बाबूलाल नालबंद.... आदी पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. ...
*अभूतपूर्व मिरवणूक*
मावळ तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने आलेल्या आमदार शेळके समर्थकांनी वडगाव बाजारपेठेचा संपूर्ण रस्ता व्यापून टाकला होता. तरुण कार्यकर्त्यांबरोबरच महिला व ज्येष्ठ नागरिक ही मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते. 'सुनील अण्णा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है', 'बच्चा बच्चा कहता है, सुनील आण्णा सच्चा है', या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता. 'सुनील अण्णा शेळके एक नंबर' यासारख्या गाण्याच्या ठेक्यावर तरुणाईचा जल्लोष सुरू होता.
*विरोधकांचा घेतला खरपूस समाचार*
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आमदार शेळके यांनी उपस्थित जनसमुदायाशी संवाद साधला. आपण केलेल्या विकास कामांची माहिती देण्याबरोबरच त्यांनी विरोधकांचाही खरपूस समाचार घेतला. दादागिरीची भाषा मावळच्या जनतेला चालत नाही. आपुलकी आणि प्रेमाने लोकांना जिंकावे लागते, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. 'शांत आणि विकसित मावळ' हे आपले ध्येय असून त्यासाठी मावळची जनता मला दुसऱ्यांदा संधी देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आमदार शेळके म्हणाले की, मागच्या वेळेला मी मावळच्या जनतेकडे एक संधी मागितली होती. मी दुसऱ्यांदा उमेदवारी कोणाकडेही मागितली नव्हती, पण मावळच्या जनतेची इच्छा लक्षात घेऊन महायुतीच्या नेत्यांनी मला यावेळीही उमेदवारी दिली. त्यामुळे माझ्या जिवाभावाच्या माणसांच्या आशीर्वाद घेण्यासाठी, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी पुन्हा आलो आहे.
रस्ते, पाणी, वीज या पलीकडे जाऊन आपण मावळचा विकास केला. गावागावापर्यंत निधी पोहोचवून विकास कामे केली. त्यांनी निधीचा पै-पैचा हिशेब मी जनतेला दिला आहे. शासकीय निधी बरोबरच दानशूर व्यक्तींकडूनही विकासासाठी पैसा आणला आणि तो विकासावर खर्च केला. आमदार होऊन आपण पैसा नाही तर जिवाभावाची माणसे कमवली, असे आमदार शेळके यांनी सांगितले. ...
*...तर पाय पकडून माफी मागीन!*
'मी कोणाला त्रास दिला असेल, कोणाचा विश्वासघात केला असेल, एक रुपयाचा भ्रष्टाचार केला असेल, तर पुराव्यांसह आरोप करा, मी पाय पकडून माफी मागीन. मात्र खोटे आरोप कधीही सहन करणार नाही,' या शब्दात त्यांनी विरोधकांना ठणकावले.
दीड वर्षांपूर्वी आपण बापूसाहेब भेगडे यांनाही ते उमेदवारीसाठी इच्छुक आहेत का, असे विचारले होते. त्यावेळी त्यांनी आमदारकीसाठी इच्छुक नसल्याचे मला स्पष्ट शब्दात सांगितले होते. पक्षाने आपल्याला न्याय द्यावा, एवढीच अपेक्षा असल्याचे ते म्हणाले होते. त्यानंतर त्यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी देण्यासाठी आपण अजितदादांकडे आग्रह देखील धरला होता. काही कारणांमुळे ते शक्य होऊ शकले नाही. त्यामुळे त्यांना अजितदादांनी महामंडळावर संधी दिली. पण बापूसाहेबांनी ती नाकारली. यात माझे काय चुकले, असा सवाल शेळके यांनी केला.
*'झाड बदलणारा पोपट'*
भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश भेगडे यांच्यावर आमदार शेळके यांनी थेट हल्ला चढवला. राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीमध्ये विष कालवण्याचे प्रयत्न करू नका, राज्यातील महायुती सरकार परत येऊ नये यासाठी प्रयत्न थांबवले नाहीत तर तुमचाही सर्व इतिहास तालुक्यासमोर मांडीन, असा इशारा शेळके यांनी दिला. एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडणारा हा मावळातील पोपट आहे, या शब्दांत त्यांनी गणेश भेगडे यांची संभावना केली.
गणेश भेगडे हे अगदी काही दिवसांपर्यंत माझ्या दैनंदिन संपर्कात होते. भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय होत होता तर त्यांनी मला सांगायचे होते. तेव्हा ते एका शब्दाने बोलले नाहीत आणि आता मात्र ते कार्यकर्त्यांचा पुळका आल्याचा आव आणत आहेत. हा त्यांचा दुटप्पीपणा मावळची जनता आणि भाजपचे कार्यकर्ते ही चांगले ओळखतात, असे शेळके म्हणाले. तुमच्या अंगावरच्या जखमा विसरून कोणाचा झेंडा खांद्यावर घेताय, असा सवाल त्यांनी केला.
*प्रत्येकाला मोफत वैद्यकीय उपचार*
पुढील पाच वर्षांमध्ये तालुक्यातील प्रत्येक नागरिकाला मोफत वैद्यकीय उपचार मिळतील, यासाठी आपण योजना तयार केली आहे. लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांना मोफत वीज आधी योजना पुढे चालू ठेवायच्या असतील तर राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणे आवश्यक आहे. त्यासाठी मला पुन्हा प्रचंड मताधिक्याने निवडून द्या, अशी विनंती त्यांनी उपस्थित जनसमुदायास केली.
यावेळी गणेश खांडगे, माऊली दाभाडे, गणेश ढोरे, रमेश साळवी आदींची भाषणे झाली. सुनील शेळके यांना यावेळी दीड लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. देविदास कडू यांनी आभार प्रदर्शन केले.
.. ...