219 views
कातकरी बांधवांसाठी अभियान ठरले आश्वासक आधार
आमदार सुनिल शेळके यांच्या प्रयत्नातून मिळाले जात प्रमाणपत्र
मागील चार वर्षांपासून आदिम सेवा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी
कातकरी बांधवांसाठी अभियान ठरले आश्वासक आधार
वडगाव मावळ :- संपुर्ण मावळ तालुक्यात आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या आदिम सेवा अभियानांतर्गत नाणे मावळातील गोवित्री, वळवंती येथील ५४ कातकरी बांधवांना जात प्रमाणपत्रांचे वाटप (सोमवार दि.९) करण्यात आले.
गोवित्री,वळवंती गावातील कातकरी समाजातील अनेक नागरिकांकडे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंरही जातीचे दाखले उपलब्ध नाहीत.शैक्षणिक कामांसाठी, शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी जात प्रमाणपत्र आवश्यक असते.परंतु या नागरिकांना जात प्रमाणपत्र काढण्याची किचकट प्रक्रियेला सामोरे जावे लागते. योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने त्रास सहन करावा लागतो. दाखला नसल्याने विविध शासकीय योजनांपासून वंचित रहावे लागते.आजपर्यंत विविध शिबिरे, योजनांच्या नावाखाली केवळ कागदपत्रे जमा केली जातात.परंतु सर्व प्रक्रिया पूर्ण करुन दाखले कोणीही मिळवून देत नव्हते.त्यामुळे आश्वासनांशिवाय या नागरिकांच्या पदरात काहीच पडले नव्हते.
परंतु आमदार शेळके यांनी आदिम सेवा अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करीत तालुक्यातील प्रत्येक वाडी-वस्तीवर जाऊन नागरिकांच्या कागदपत्रांची पूर्तता करुन घेणे व शासन दरबारी सातत्यपूर्ण पाठपुरावा करणे यामुळे या नागरिकांना अखेर जातीचे प्रमाणपत्र घरपोच उपलब्ध झाले.अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जातीचे दाखले मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी आमदार सुनिल शेळके जनसंपर्क कार्यालयाचे प्रतानिधी सचिन वामन, रुपेश सोनुने, गणेश तळपे,अमोल पवार व ग्रामस्थ उपस्थित होते.