96 views
लोणावळा नगरपालिकेत घेतली आमदार शेळके यांनी आढावा बैठक
लोणावळा, -पर्यटकांचे आकर्षण असलेल्या खंडाळा तलावातील नौका विहार (बोटिंग) सुरु व्हावा तसेच भविष्याचा विचार करता लोणावळा शहरात भूमिगत वीजवाहिन्यांची कामे प्राधान्याने मार्गी लागायला हवी,अशी सूचना मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी केली.
लोणावळा नगरपालिका हद्दीतील विविध विकासकामांच्या संदर्भातील आढावा बैठक नगरपरिषद सभागृहात आज झाली. त्यावेळी आमदार शेळके बोलत होते.
या बैठकीस नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे, माजी नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी तसेच किरण गायकवाड, पोलीस निरीक्षक सुहास जगताप, पल्लवी पिंगळे, शिवाजी चव्हाण, माजी नगरसेवक देवीदास कडू, आरोही तळेगावकर, अंजनाताई कडू, विलास बडेकर, नारायण पाळेकर, अरुण लाड, दत्ताभाऊ येवले, आशिष बुटाला, ब्रिंदा गणात्रा, भरत चिकणे,उमाताई मेहता, मुकेश परमार,निखिल कवीश्वर, बाबा ओव्हाळ, झिशान शेख, दत्ता दळवी, सनी पाळेकर, वैभव देशपांडे आदी उपस्थित होते.
काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात झालेल्या बैठकीतील मुद्द्यांवर प्रशासनामार्फत काय कार्यवाही करण्यात आली याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.
यात प्रामुख्याने प्रलंबित असलेल्या भांगरवाडी पुलाच्या कामाबाबत व अनुकंपा तत्त्वावरील वारसांना नोकरी संदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे भूमी अभिलेख अधिकाऱ्यांसमवेत तात्काळ बैठक लावण्याबाबत आमदार शेळके यांनी आदेश दिले.
उर्दू शाळेचे अंदाजपत्रक तयार करण्यासाठीच्या कामांना गती द्यावी, तुंगार्ली येथे जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्याच्या कामास गती द्यावी.पर्यटकांचे आकर्षण असलेल्या खंडाळा तलावातील बोटिंग सुरु व्हावी याबाबत चर्चा करण्यात आली.
भविष्याचा विचार करता पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या लोणावळा शहरात भूमिगत वीज वाहिन्यांची कामे प्राधान्याने मार्गी लागायला हवी यासाठी अंदाजपत्रक तयार करुन किती निधीची आवश्यकता आहे व त्यानुसार निधीसाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे आमदार शेळके यांनी सांगितले.
बैठकीत विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली व संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिकांच्या समस्या देखील आमदार शेळके यांनी जाणून घेतल्या.