138 views
सुनीलअण्णा आम्ही सख्ख्या नसलो तरी पक्क्या बहिणी - वर्षा नवघणे*
वडगाव मावळ, १५ नोव्हेंबर - काही पुढाऱ्यांनी एकटं पाडायचा प्रयत्न केला असला तरी सुनीलअण्णा तू एकटा नाहीस. मावळातील समस्त मातृशक्ती सदैव तुझ्या पाठीशी आहे. मावळातील लाडक्या बहिणींबरोबरच लाडक्या भाच्यांचंही अफाट प्रेम तुम्ही मिळवले आहे. त्यामुळे कोणी काहीही केलं तर सुनीलअण्णांचा विक्रमी विजय ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असा विश्वास राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केला.
मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- भाजप- शिवसेना- आरपीआय- एसआरपी महायुतीचे उमेदवार आमदार सुनील शेळके यांनी आज (शुक्रवारी) सांगवी, जांभूळ, ब्राह्मणवाडी, मोहितेवाडी, साते, कान्हे या गावांचा जनसंवाद दौरा केला. ब्राह्मणवाडी येथे झालेल्या जनसंवाद सभेत चाकणकर बोलत होत्या. त्यावेळी आमदार सुनील शेळके, ज्येष्ठ नेते गणेशअप्पा ढोरे, सरपंच वर्षा नवघणे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ प्रचंड संख्येने उपस्थित होते. रांगोळ्यांच्या पायघड्या, ढोलताशांचा दणदणाट, औक्षणासाठी सुवासिनींच्या रांगा, गुलाबी फेटे घातलेल्या माता-भगिनींची प्रचंड गर्दी अशा वातावरणात ठिकठिकाणी आमदार शेळके यांचे स्वागत करण्यात आले.
रुपाली चाकणकर म्हणाल्या की, तालुक्यातील केलेली प्रचंड विकासकामे, अफाट जनसंपर्क यामुळे आमदार शेळके यांना माता-भगिनींसह मावळातील मायबाप जनतेचे प्रचंड प्रेम मिळत आहे. एवढे प्रेम फारच थोड्या लोकांच्या नशिबी असते. हे प्रेम कमवावे लागते. धमकावून असे प्रेम कधीच मिळत नाही. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक निधी मावळ तालुक्याला आणण्याचे सर्व श्रेय सुनील शेळके यांचे आहे. त्यांनी तो निधी तालुक्यातील वाड्या-वस्त्यांपर्यंत पोहचविण्याचे कामही केले. अपार मेहनतीतून त्यांनी जनतेचे हे प्रेम मिळविले असून मावळची मायबाप जनता त्यांना कधीही एकटे पडू देणार नाही.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महायुती सरकारने प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यात दरमहा दीड हजार रुपये जमा केले. महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर ही रक्कम दरमहा २,१०० रुपये करण्यात येणार आहे. त्यासाठी महायुती पुन्हा सत्तेत येणे आवश्यक आहे. त्यासाठी माता-भगिनींनी सुनीलअण्णांना भरभरून मतदान करावे, असे आवाहन चाकणकर यांनी केले.
आमदार शेळके म्हणाले की, माझी भावकी छोटी असली तरी तुम्ही सगळी गावकी माझ्या पाठीशी उभी केली. काम करण्यासाठी निवडून देता. कामे झाल्याचे समाधान लोकांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. शासनाच्या योजनांतून सर्वसामान्यांना आधार देणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्यच आहे. लोकप्रतिनिधी काम करून जनतेवर कोणतेही उपकार करत नाहीत. या गावात येऊन विरोधकांनी केलेल्या उपकाराच्या भाषेचा मी निषेध करतो.
मावळची जनता दमदाटीची भाषा खपवून घेत नाही. मी तालुक्यात कामे केली नाहीत, मी कार्यकर्त्यांवर अन्याय केला, हे विरोधकांना पाच वर्षांत दिसले नाही, पण महायुतीने माझी उमेदवारी जाहीर केल्यानंतर १५ दिवसांत या मंडळींना तसा साक्षात्कार झाला. मी कोणाला त्रास दिला नाही, कोणाला लुबाडले नाही. लोकांकडून व्याज घेतले नाही, गावागावात जाऊन दहशत केली नाही. त्यामुळे मायबाप जनता माझ्यावर प्रेम करते. तुमच्यावर करत नाहीत. यात माझा काय दोष, असा सवाल करीत आमदार शेळके यांनी विरोधकांचे वाभाडे काढले.
आम्ही सर्वजणी सुनीलअण्णांच्या सख्ख्या नसलो तरी पक्क्या बहिणी आहोत, असे सांगत सरपंच वर्षा नवघणे यांनी आमदार शेळके यांनी ब्राह्मणवाडीच्या विकासासाठी केलेल्या कामांचा पाढाच वाचला.
*आमची पॉलिसी सुनीलअण्णा*
गावातील धनश्री दादाभाऊ शिंदे ही तरुणी अण्णांविषयी बोलताना म्हणाली, 'आमच्या शिक्षणाची पॉलिसी सुनीलअण्णा, आमच्या आरोग्याची पॉलिसी सुनीलअण्णा, आमच्या सुरक्षिततेची पॉलिसी सुनीलअण्णा, एवढंच नाही तर आमच्या लग्नाची पॉलिसी पण सुनीलअण्णाच आहे.'
यावेळी ग्रामस्थांनी 'कोण म्हणतं ९० टक्के, शंभर टक्के, शंभर टक्के', 'कोण म्हणतं येणार नाही. आल्याशिवाय राहणार नाही' अशा घोषणा देत आमदार शेळके यांच्या विजयाचा निर्धार केला.