मावळातील 'मतदारराजा'ची पोलीस आयुक्तांकडे संरक्षणाची मागणी*

1627 views

काळ्या काचांच्या मोटारी, गुंडांचा वावर आणि फोनवर धमक्या'*


Author : Admin
Publisher : Admin
Update : 5 days ago
Date : Fri Nov 15 2024

image..


*दहशतीच्या वातावरणात मतदानाला बाहेर तरी कसं पडू, मतदारराजाचा पोलीस आयुक्तांना सवाल*


तळेगाव दाभाडे, १५ नोव्हेंबर - तळेगाव दाभाडे शहरात व तालुक्यात फिरणाऱ्या काळ्या काचांच्या मोटारी, त्यातून फिरणारे गुंड यांनी मावळ विधानसभा मतदारसंघात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण केले. धमक्यांच्या फोनमुळे रिंग वाजली तरी छातीत धस्स होतं, असे भीतीचे वातावरण असेल तर आम्ही मतदानाला घरातून बाहेर कसं पडायचं, असा सवाल खुद्द मतदारराजानेच पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तांना केले आहे. लोकशाहीच्या या सर्वात मोठ्या उत्सवात स्वतः मतदारराजानेच पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली आहे.


या संदर्भात पोलीस आयुक्त कार्यालयात प्राप्त झालेला लेखी अर्ज संपूर्ण मतदारसंघात चर्चेचा विषय झाला आहे. आपल्या जीवितास धोकास होऊ शकतो, म्हणून आपण अर्जात नाव, पत्ता व फोन नंबर दिला नसल्याचे अर्जदाराने म्हटले आहे. अर्जदार हा तळेगाव दाभाडे येथे राहणारा असून आपण मावळातील समस्त मतदारांच्या वतीने हा अर्ज करीत आहे, असे त्याने अर्जात नमूद केले आहे.


गेल्या काही दिवसांत तळेगाव व परिसरात काळ्या काचांच्या मोटारी मोठ्या प्रमाणात फिरताना दिसू लागल्या आहेत. स्थानिक व बाहेरगावाहून आलेले गुंड रस्त्यावर फिरून सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करीत आहेत. सर्वसामान्य मतदारांनाही फोन करून धमकी देण्याचे काम चालू आहे. त्यामुळे मतदार भयभीत झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी जास्तीत जास्त बंदोबस्त वाढवावा. सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी. कोबिंग ऑपरेशन करून समाजविघातक प्रवृत्तीच्या लोकांना गजाआड करावे, अशी मागणी या अर्जात करण्यात आली आहे.


विधानसभा निवडणुकीमुळे तालुक्यातील वातावरण विनाकारण तापविण्याचा प्रयत्न सुरू आहे. दिवसाढवळ्या व रात्रीच्या वेळी काळ्या काचांच्या गाडया व गुन्हेगारी प्रवृत्तीचे तरूण सर्रासपणे फिरत असतात, तसेच काही उमेदवारांकडून देहूरोड, देहू, वराळे, तळेगाव दाभाडे या हद्दीमध्ये सर्वसामान्य नागरिकांना धमक्यांचे फोन येत आहेत.आमच्याच उमेदवारालाच मतदान करायचे अन्यथा तुमचे घराचे बाहेर पडणे मुश्किल करू, निवडणूक झाल्यानंतर आम्ही तुमच्याकडे बघू अशा धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप अर्जात करण्यात आला आहे.


काही उमेदवारांचे नातेवाईक व गुन्हेगार समक्ष भेटून अथवा फोन करून मतदारांना धमकावत आहेत. प्रेमाने सांगून ऐकले नाही तर महिलांना व तरूणांना शिवीगाळ करणे व मारहाण करण्यापर्यंत घटना सर्रास घडत आहेत.हे प्रकार थांबवून मतदारांच्या मनात विश्वास निर्माण होण्यासाठी पोलीस आयुक्तांनी त्वरीत योग्य ती पावले उचलावीत व जे कोण गुन्हेगार असतील किंवा दमटाटी करत असतील अशांवर कारवाई करावी, कोबिंग ऑपरेशन करावे तसेच काळ्या काचांच्या गाडयांवर कारवाई करावी. पोलीस बंदोबस्त वाढवावा, अशी मागणी अर्जात करण्यात आली आहे.


सर्वसामान्य नागरिकांना लोकशाहीचा उत्सव आनंदाने साजरा करण्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण होण्यासाठी पोलीस आयुक्त आवश्यक कारवाई करतील, अशी आशा अर्जदाराने शेवटी व्यक्त केली आहे.