नवनवीन व्यवसाय उभारून खरेदी विक्री संघ बळकट करा- सहाय्यक निबंधक सर्जेराव कांजळकर

216 views


Author : Admin
Publisher : Admin
Update : 6 months ago
Date : Sun Sep 29 2024

image...


वडगाव मावळ :मावळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून नवीन व्यवसाय उभारण्याचा प्रयत्न करून संस्था बळकट करावी असे आवाहन मावळचे सहाय्यक निबंधक सर्जेराव कांजळकर यांनी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना केले.


खरेदी विक्री संघाचे सभापती शिवाजी असवले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी, उपसभापती अमोल भोईरकर, संचालक रमेश भुरुक, एकनाथ येवले, रुपेश घोजगे, बाजीराव वाजे, विष्णू घरदाळे, ज्ञानेश्वर निंबळे, शहाजी कडू, प्रमोद दळवी, माणिक गाडे, गणेश विनोदे, किरण हुलावळे, मधुकर जगताप, शरद नखाते, मनीषा आंबेकर, सुनिता केदारी, सचिव किरण लोहोर उपस्थित होते.


सहाय्यक निबंधक कांजळकर म्हणाले, मावळ तालुक्यातील खरेदी विक्री संघ ही संस्था जुनी संस्था असून शासनाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेऊन संस्थेच्या माध्यमातून अनेक व्यवसाय सुरू करता येऊ शकतात. भागभांडवल उभारून नवनवीन व्यवसाय सुरू केल्यास संस्था संक्षम होण्यास वेळ लागणार नाही असा विश्वास व्यक्त केला.


सभापती शिवाजी असवले यांनी गेल्या सहा महिन्याच्या कार्यकाळात नवीन संचालक मंडळाच्या माध्यमातून संस्थेच्या उन्नतीसाठी आवश्यक असणारे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने करण्यात आलेले प्रयत्न, आगामी काळात करावयाचे प्रकल्प याबाबत माहिती दिली व पाच वर्षांच्या कार्यकाळात संघ आर्थिक दृष्ट्या सक्षम झालेला असेल असा विश्वास व्यक्त केला. माजी संचालक गुलाब तिकोणे, मारुती खांडभोर, लक्ष्मण गायकवाड यांनी विविध प्रश्न उपस्थित केले, संचालक ज्ञानेश्र्वर निंबळे यांनी प्रास्ताविक केले, सचिव किरण लोहार यांनी सूत्रसंचालन केले तर किरण हुलावळे यांनी आभार मानले.