556 views
निधन वार्ता
मावळ तालुक्यातील पवन मावळ भागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जुणे जाणते नेते आबूराव बाबूराव धनवे यांचे आज (दिनांक 28 एप्रिल) प्रदीर्घ आजाराने निधन झाले. शिळींब येथे राहत्या घरी आज सकाळी 9 वा. 15 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर शिळींब गावातील वैकुंठ स्मशानभूमीत दुपारी अडीच वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.
राष्ट्रवादीचे कट्टर आणि अनुभवी नेतृत्व अशी आबूराव धनवे यांची पवन मावळ विभागात ओळख होती. ग्रामपंचायत, दुध संघ, विविध कार्यकारी सोसायटी, सहकार यांद्वारे त्यांनी राजकारणात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. शिळींब गावच्या राजकारणात त्यांची अनेक वर्षे सत्ता होती. यासह शिळींब दूध सोसायटी, विविध कार्यकारी सोसायटी याचे ते माजी चेअरमन होते.
मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नंदकुमार धनवे हे आबूराव धनवे यांचे चिरंजीव. यासह त्यांचे नातू विजय धनवे हे सध्या शिळींब ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच आहेत. आबूराव धनवे हे जुण्या काळातील राजकारण्यांपैकी एक होते. कृष्णराव भेगडे, मदन बाफना यांच्याशी त्यांचा सलोखा होता.
मागील अनेक दिवसांपासून आबूराव धनवे हे आजारी होते. मध्यंतरी काळात त्यांच्या तब्येतीत सुधारणा जाणवत होती. परंतू बंधू शंकर धनवे यांच्या निधनाने ते खचले होते. तेव्हापासून त्यांच्या तब्येतीत चढउतार जाणवत होता. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पाठीमागे मुले, सुना, मुली, जावई, नातू, नातसुना असा मोठा परिवार आहे. विविध क्षेत्रातून आबुराव धनवे यांच्या निधनावर शोक व्यक्त केला जात असून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.