तृणधान्य नियमित आहारात, आरोग्य नांदेल घराघरात

238 views

...


Author : Admin
Publisher : Admin
Update : 9 months ago
Date : Thu Feb 08 2024

imageतृणधान्य



पौष्टिक तृणधान्य हे आपले पारंपरिक, पोषणयुक्त, पौष्टिक, आरोग्यदायी अन्न असून त्याचा दिवसेंदिवस आहारातील वापर कमी होत आहे. त्यामुळे आपल्याला विविध आजारांचा सामना आपल्याला करावा लागत आहे. बदलत्या जीवनशैलीत आहाराकडे होत असलेले दुर्लक्ष आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या आजारावर मात करण्याकरीता ज्वारी, बाजरी, नाचणी, राळा, वरई, कोदो, कुटकी, सावा, राजगिरा यासारखी पौष्टिक तृणधान्यांचा आहारात समावेश करण्याची गरज भासत आहे. 


आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष


भारत सरकारने वर्ष २०१८ हे राष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले. यावर्षीपासून त्यांना पोषक धान्य किंवा पोषक तृणधान्ये म्हटले जात आहे. संयुक्त राष्ट्र संघाने २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ म्हणून घोषित केले असून याअनुषंगाने राज्यात १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत पौष्टिक तृणधान्याची उत्पादन वाढ, तंत्रज्ञान प्रसार, मूल्यसाखळी विकास आदीसाठी ‘महाराष्ट्र श्री अन्न अभियान’ राबविण्यात येत आहे.


मिलेट ऑफ मंथ’संकल्पना


‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’अंतर्गत ‘मिलेट ऑफ मंथ’ या संकल्पनेनुसार जानेवारी महिना बाजरी, फेब्रुवारी महिना ज्वारी, ऑगस्ट महिना राजगिरा, सप्टेंबर राळा, ऑक्टोबर वरई आणि डिसेंबर महिना नाचणी म्हणून साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत राज्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन तृणधान्यांचे महत्व तसेच आहारात समावेश करण्याबाबत प्रोत्साहित करण्यात आले आहे. 


 ज्वारी (सोरगम मिलेट्स)


ज्वारी हे तृणधान्य असून ते ग्लुटेनमुक्त व मोठ्या प्रमाणात तंतुमय पदार्थ असणारे धान्य आहे. प्रथिने, थायमिन, नियासिन व जीवनसत्व बी-६ यांचा चांगला स्त्रोत आहे. ज्यांना ग्लुटेनचा त्रास होतो किंवा ज्यांना लहान आतड्याचा विकार आहे, अशा लोकांसाठी ज्वारी हा एक चांगला पर्याय आहे. ज्वारी हा अँटीऑक्सिडंटस घटकांचा एक चांगला स्त्रोतदेखील असून त्यामुळे कर्करोग व इतर रोगांपासून संरक्षण होण्यास मदत होऊ शकते. ज्वारीमध्ये मॅग्रेशियम, पोटॅशियम व जस्त या खनिजे अधिक प्रमाणात असतात. 


बाजरी (पर्ल्स मिलेट्स)


बाजरी पचण्यास हलक्या तंतुमय घटकांनीयुक्त असल्यामुळे त्यास ‘सर्वोत्तम अन्नपदार्थ’ असे म्हणतात. वजन कमी करणे, रक्तातील मेदाचे प्रमाण कमी करण्यास मदत करते. बाजरीत कॅल्शियम, मॅग्रेशियम व लोह यांसारख्या खनिजांनी संपन्न असल्यामुळे एकूणच आरोग्य सुधारण्याच्यादृष्टीने ती अत्यंत उपयुक्त आहे.

 

बाजरी हा फॉस्फरससमृद्ध स्त्रोत असून शरीरातील पेशी संरचनेतील तो एक महत्वाचा भाग आहे. मधुमेह नियंत्रित करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. अधिक तंतुमयतेमुळे बाजरीचे पचन मंदगतीने होते. अन्य अन्नपदार्थाच्या तुलनेत कमी वेगाने रक्तात शर्करा सोडण्याचे काम करते. बाजरी हृदयाचे आरोग्य राखण्याच्यादृष्टीने महत्वाची भूमिका पार पाडते. आरोग्याच्या दृष्टीने अनावश्यक परिणाम कमी करण्याचे घटक असल्यामुळे हृदयविकाराचा धोका टाळण्यास मदत होते. 


सावा (लिटल मिलेट्स)


लघु तृणधान्य हे छोटे, गोल व लालसर करड्या रंगाचे असते. त्यांना कुटकी, काब्बु आणि पोन्नी असे म्हटले जाते. ती मॅग्रेशियम, पोटॅशियम, जस्त व लोह याचा समावेश असलेल्या खनिज पदार्थांचा उत्तम स्त्रोत आहे. मॅग्नेशियम हृदयाचे आरोग्य वाढवते तर फॉस्फरस हे वजन कमी करण्याचे ऊतीची भरपाई करण्याचे व ऊर्जा निर्मितीचे कार्य करते. लघु तृणधान्य हे पाचक तंतुमय पदार्थ व जीवनसत्व बी-१, बी-२ व बी-६ यांच्यासारख्या जीवनसत्वांचा उत्तम स्त्रोत आहेत. त्यामध्ये मेद व कॅलरीज प्रमाण कमी आहेत. 


आगामी काळात निरोगी आयुष्य जगण्यासाठी आहारात तृणधान्याचे महत्व अधिक प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे प्रत्येकांनी आपल्या आहारात तृणधान्यांचा अधिकाधिक समावेश करुन शेतकऱ्याला आर्थिकदृष्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. (क्रमश:)